Friday, March 29, 2024
Homeभंडारासावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्ये प्रेरणादायी - संदीप कदम

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्ये प्रेरणादायी – संदीप कदम



भंडारा – महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. जिल्हा परिषद सभागृहात आयोजित सावित्री उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.


सावित्रीबाई फुले जयंती निमित्य जिल्हा परिषद सभागृहात आयोजीत कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे, जि.प. जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनिषा कुरसंगे, सहायक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय नंदागवळी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदिप काठोळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पानझडे म्हणाले, महिलांनी सावीत्रीबाईंचे विचार आत्मसात करणे खूप आवश्यक आहे. त्यावेळच्या विपरीत परिस्थितीत अंधश्रध्दा, बालविवाह, शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य मोलाचे आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे सुध्दा कार्य महत्वाचे असून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात त्यांचे चांगले योगदान लाभत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रात महिला पुढे आल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक साक्षर बनविण्याचे काम सुरू आहे. महिला बचत गटातील महिलांनी संचार बंदीच्या कालावधीत उत्तम कार्य केले आहे. बचत गटातील महिलांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे. असे ते म्हणाले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनिषा कुरसंगे प्रास्ताविकात म्हणाल्या की, कोवीड -१९ च्या कालावधीत आशासेविका, अंगणवाडी सेविका व बचत गटातील महिलांनी आपल्या परिवाराची चिंता न करता उत्तम कार्य केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या या महिला कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कोविड १९ च्या काळात उत्तम कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका मंदा गाढवे, विजया सार्वे, शारदा झोडे, सुनंदा चौधरी, करिश्मा एम. उईके, पोषण आहार अभियानमध्ये चांगले कार्यकेल्याबद्दल अंगणवाडी सेविका सुजाता धारगावे, भारती राजुरकर, पर्यवेक्षिका वर्षा मेंढे, शकूंतला निमकर, गिता उके तर कुपोषण निर्मुलनामध्ये उत्तम कार्य केल्याबद्दल पर्यवेक्षिका छाया ढोरे व अंगणवाडी सेविका नलिनी आकरे, आधार सिडींग मध्ये चांगले कार्यकेल्याबद्दल अंगणवाडी सेविका राणी कुर्वे, माझी कन्या भागश्री योजनेमध्ये चांगले कार्यकेल्याबद्दल पर्यवेक्षिका पुष्पा रामटेके, अंगणवाडी सेविका निर्मला भालेराव तर बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत दोन मुलींवर शस्त्रक्रीया करणाऱ्या पालकांचा यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन बाल विकास प्रकल्प अधिकारी योगीता परसमोडे यांनी केले- आभार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी मानले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

1 COMMENT

Most Popular