महामार्गावर खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले
लाखनी :
शहरात लाखनी शहराला दोन भागात छेदणारा राष्ट्रीय महामार्ग असून गेल्या २ वर्षापासून महामार्गावर जे.एम.सी कंपनी मार्फत उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या सर्विस रोडने तर कधी महामार्गाने वाहतूक वळविली जाते. अवजड वाहतुकीमुळे सर्विस रोडवर तसेच महामार्गावर मोठ्या प्रमानात खड्डे पडल्यामुळे सध्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या पावसाळयाचे दिवस असून खड्ड्यांमध्ये पाणी भरून राहते. त्यामुळे चालकाला अंदाज येत नाही तोल जावून अपघात घडत असल्यामुळे अपघात दररोज होत आहेत.दररोज किरकोळ अपघात होत असले तरी काही काहींच्या पोलिस ठाण्यात नोंदी होतात तर काही आपसात तडजोड केली जाते.

लाखनी येथे उड्डाण पूलाची निर्मिती व्हावी यासाठी अनेकदा आंदोलने झाली. त्याची दखल घेत केंद्रीय रास्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते उड्डाण पुलाचे भूमीपूजन पार पडण्यात आले होते. तब्बल ४ वर्षाच्या कालावधी नंतर बांधकामाची प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली असून गेल्या २ वर्षापासून उड्डाण पुलाचे बांधकाम मुंबई येथील जे.एम.सी कंपनी मार्फत सुरू आहे. महामार्गासोबत सर्विस रस्त्याचेही दुरुस्तीचे काम कंपनी कडेच आहे. केसलवाडा (फाटा) ते लाखनी स्मशानघाटापर्यन्त उड्डाण पुलाचे बांधकाम काम सुरू आहे. वाहतुकीच्या वर्दळीमुळे शहरात ठीकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यामध्ये तोल जावून दररोज लहान –मोठे अपघात होत असतात. त्यामुळे अनेक नागरिक किरकोळ जखमी तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे जीवघेणे ठरत आहेत.
जेएमसी कंपनी मार्फत थातुरमातुर खड्डे बुजविले जातात आणि लगेच पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडत असल्यामुळे दुचाकी तसेच अन्य वाहन चालकांचा तोल जात असल्यामुळे अपघात मोठ्या प्रमानात होत आहेत. या बाबत वारंवार जेएमसी कंपनीला मागणी करूनही ते रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाही. त्यामुळे जेएमसी कंपनी नागरिकांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत आहे.