◆ 1000 खाटांची असेल उपलब्धता
◆ सर्व सोयी सुविधा युक्त सुसज्ज हॉस्पिटल उभारणार
◆ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांची माहिती

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी राज्यशासन आणि सर्व यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या परिस्थितीमध्ये अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी जागा नाही अशा पद्धतीची माहिती मिळते. मात्र सर्व रुग्णांना सर्व आवश्यक उपचार मिळाले पाहिजेत ही आपली भूमिका असून यादृष्टीने वरठी येथे सनफ्लेग कंपनी जवळ 1000 खाटांची व्यवस्था असलेले आणि सर्व सुविधा यांनी सुसज्ज असलेले कोविड हॉस्पिटल युद्ध स्तरावर उभारण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार मा. नानाभाऊ पटोले यांनी दिली. ते आज वरठी लगतच्या संबंधित जागेची पाहणी करण्यासाठी आले होते. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माननीय जिल्हाधिकारी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक तथा सर्व अधिकारी, माननीय जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. मोहन पंचभाई आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की हे हॉस्पिटल पूर्व विदर्भातील सगळ्यात मोठे हॉस्पिटल राहणार असून यामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध राहतील आणि या हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील अनेक रुग्णांना उपचार घेता येईल. सदर हॉस्पिटल उभारणीचे कार्य याच आठवडयात सुरु होईल आणि येत्या तीन ते चार आठवडयात हे काम पूर्ण होईल. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असा आशावाद काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. श्री. नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केला.