Sunday, May 28, 2023
Homeभंडाराराजीव गांधी देश घडविणारे व्यक्तिमत्त्व - मोहन पंचभाई

राजीव गांधी देश घडविणारे व्यक्तिमत्त्व – मोहन पंचभाई

*’तयांचे व्यर्थ न हो बलिदान’ उपक्रम
*जयंतीदिनी तालुक्यात सदभावना रॅलीचे आयोजन
पवनी/प्रतिनिधी


स्वातंत्रापूर्वी व नंतर देखील देशाला कांग्रेसचे मोठे योगदान आहे. परकीय शत्रूंना हाकलून लावण्यासाठी कांग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेले बलिदान अविस्मरणीय असतांना वर्तमान केंद्रातील भाजप सरकारने देशाला पारतंत्र्यात घेऊन जाण्याचे कार्य आरंभिले आहे. देश उभारणीसाठी ज्या ज्या क्रांतिवीरांनी बलिदान दिले त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘तयांचे व्यर्थ न हो बलिदान’ या उपक्रमांतर्गत राजीव गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त सदभावना रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राजीव गांधीनी विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, शैक्षणिक, औद्योगिक क्रांतीवर भाष्य करताना राजीव गांधी देश घडविणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे मत कांग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले सन 1942 ला ‘चले जाव’ चा लढा उभारण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात देशाप्रती निष्ठा असणाऱ्या अनेक व्यक्तींनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. गांधी, नेहरु यांच्या पुढाकारातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशप्रेमाचा वारसा समर्थपणे जोपासणाऱ्या कुटुंबातील स्वर्गीय इंदिरा गांधींची हत्या होताच राजीव गांधी यांचेवर ऐन तारुण्यात पंतप्रधानपदाची जबाबदारी आली. दरम्यान राजीव गांधींनी संगणक व मोबाईल क्रांतीची पाळेमुळे रोवल्याने राजीव गांधीं विज्ञान क्रांतीला दिशा देणारे नेतृत्व होते. विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हरितक्रांती होण्यासाठी गोसेखुर्द धरण प्रकल्पाला मंजुरी प्रदान करून राजीव गांधी स्वतः भूमिपूजनासाठी वैनगंगा नदीवर आलेत. त्यांच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या गोसे धरण परिसरात स्मारकाचे बांधकाम प्रगती पथावर आहे. राजीवजींनी तरुणांना अठरा वर्षाचा मतदानाचा अधिकार देऊन देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. गावांचा विकास व्हावा यासाठी पंचायत राज कायदा बनविला. नवोदय सारखे विद्यालय निर्माण करून शैक्षणिक क्रांती केली. त्यांच्या सदर कार्याने ते दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते असे सांगताना त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात म्हणून सद्भावना रॅलीची उपलब्धता असल्याचेही पंचभाई म्हणाले.
स्व. राजीव गांधी स्मारक समिती व भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे प्रणेते भारतरत्न स्व.राजीवजी गांधी जयंती निमित्त पवनी ते राजीव गांधी स्मारक गोसेखुर्द सदभावना मोटारसायकल व कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
मोटारसायकल व कार रॅली ची सुरुवात गांधी चौकातील महात्मा गांधी यांचे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर,जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, माजी जि. प. सभापती विकास राऊत,जिल्हा कॉंग्रेसचे महासचिव विजय रायपूरकर,धर्मेंद्र नंदरधने, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शंकरराव तेलमासरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांचे यांचे नेतृत्वाखाली सद्भावना रॅली पवनी नगरातील गांधी भवन , गांधी चौक , शिवाजी महाराज चौक , नेताजी चौक,तुकडोजी महाराज चौक , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , चंद्रशेखर आझाद चौकातून तालुक्यातील कोदूर्ली, धानोरी , भोजापुर ,खातखेडा , सावरला , सेडी/सोमनाळा, ढोरप , कन्हाळगाव , सिरसाळा , निष्टी, भुयार , मेंढेगाव , निलज ,वाही , निमगाव , सिंदपुरी भेंडाळा , वलनी , मांगली , आसगाव (चौ.), ब्रम्ही ,भावड , पिंपळगाव कातूर्ली , केसलवाडा , चिखली , अड्याळ , कोंढा/ कोसरा, आकोट , चिचाळ, पाथरी , गोसे(बु) येथून स्व.राजीव गांधी स्मारक गोसेखुर्द येथे रॅलीचे समारोप करण्यात आला. गावागावात रॅलीचे स्वागत मोठ्या उत्साहाने जनतेनी करून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
रॅलीचा समारोप जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांचे अध्यक्षतेखाली सभा घेऊन करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विकास राऊत, धनंजय तिरपुडे , गंगाधरराव जिभकाटे, शालु टेकाम, मनोहर उरकूडकर, धर्मेंद्र नंदरधने, देवेंद्र हजारे, कमलाकर रायपूरकर, पांडुरंग निशाणे, अनिकेत गभने , अमित पारधी, महेश नान्हे, निलेश सावरबांधे, मोहित मोहरकर , रामचंद्र मेश्राम, भगवान नवघरे,तुळशिदास बिलवने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक शंकरराव तेलमासरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पारधी यांनी तर आभार प्रकाश पचारे यांनी मानले. रॅलीत युवक काँग्रेस, एन एस यु आय, सेवादल , महिला कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular