भंडारा-दिल्ली प्रवाशादरम्यान घटना*
भंडारा :
भंडारा-दिल्ली प्रवाशादरम्यान अज्ञात इसमांनी बॅगमधील 3 लाख 70 हजार रुपये पळवून नेल्याची घटना 11 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

भंडारा शहरातील हनुमान मंदिर परिसरातील रहिवासी रेवानाथ ढोमनू धकाते (50) हे भंडारा येथून दिल्ली येथे प्रवाशाकरिता निघाले होते. 10 नोव्हेंबर रोजी ते आपल्या एका कामगारासोबत भंडारा बसस्थानकावरून नागपूर रेल्वे स्थानकावर गेले. यानंतर चैन्नई-निजामुद्दीन या दुरोन्तो एक्सप्रेसने दिल्लीकरिता रवाना झाले.11 रोजी दिल्ली येथे पोहचल्यानंतर एका हॉटेलमध्ये त्यांनी आपली ट्रॉली बॅग उघडून बघीतली असता त्यामध्ये ठेवलेले 3 लाख 70 हजार रुपये दिसून आले नाही. प्रवाशादरम्यान बॅगमधील रक्कम चोरी झाल्याचे लक्षात येताच याविषयीची तक्रार निजामुद्दीन रेल्वे पोलिसांकडे करण्यात आली. सदर तक्रार भंडारा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याने येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.