Sunday, May 29, 2022
Homeभंडाराबालविकास सेवा प्रकल्पात कुपोषित बालकांची संख्या वाढली !

बालविकास सेवा प्रकल्पात कुपोषित बालकांची संख्या वाढली !

लाखनी प्रकल्पातील प्रकार * उपाययोजनांची गरज
लाखनी :
कोविड-१९ ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून अंगणवाडी केंद्र बंद असल्यामुळे पूरक पोषण आहार लाभार्थी बालकांच्या कुटुंबीयांकडे दिला जातो. पण एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प लाखनी चे आकडेवारीनुसार मार्च २०२१ मध्ये तीव्र कुपोषित बालकं ९० , मॅम श्रेणीतील ६५ आणि सॉम वर्गवारीतील ५ अशी एकूण तालुक्यात १६० कुपोषित बालकं होते. त्यांची संख्या जून २०२१ मध्ये अनुक्रमे ९१ , ६३ ,१० एकूण १६४ झाली असल्याने कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले आहे. त्यांना सामान्य श्रेणीत आणण्याकरिता योग्य त्या उपाययोजनांची गरज आहे.


तालुक्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा. याकरिता लाखनी त एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पास २ जून २००८ मध्ये सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाचे अधिनस्त १४८ अंगणवाडी केंद्र आणि १५ मिनी अंगणवाडी असे एकूण १६३ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. यात गरोदर व स्तनदा मातांचे नियमित लसीकरण तथा सकस पूरक पोषण आहार पुरवठा केला जातो. तसेच ३ ते ६ वर्षीय वयोगटातील बालकांना महिला व बालविकास विभाग आयुक्तालयामार्फत पोल्ट्रीफाइड पूरक पोषण आहार पुरवठादारामार्फत अंगणवाडी केद्रांना पुरविण्यात येत होता. पण कोविड-१९ ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून अंगणवाडी केंद्र बंद असल्यामुळे आता प्रत्येकी २ महिन्यासाठी पुरेल एवढे १० पॅकेट अन्नधान्य पुरवठा केला जातो.
अंगणवाडी केंद्रात दारिद्र्य रेषेखालील आणि गरीब कुटुंबातील भूमिहीन शेतमजूर व अल्प अत्यल्प शेतकऱ्यांची बालकं प्रामुख्याने जात असल्यामुळे कुपोषित असतात. त्यात वयानुसार वजन आणि उंचीनुसार वजनाचा विचार करून कुपोषणाचे प्रमाण ठरविले जाते. मागील अनेक वर्षापासून अंगणवाडीतील पात्र बालकांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. यावर शासनाचा अब्जावधी रुपयांचा खर्च होत असला तरी कुपोषणाची समस्या आजही कायम असल्याचे वास्तव आहे. ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालके कुपोषणापासून मुक्त होण्याकरिता महिला व बालविकास विभागाकडून ठोस आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. मार्च २०२१ मध्ये लाखनी बालविकास प्रकल्पाअंतर्गत तीव्र कुपोषित ९० , मॅम ६५ व सॉमl श्रेणीत ५ अशी एकूण १६० बालके कुपोषित होती. जून २०२१ मध्ये त्यात भर पडून कुपोषित बालकांची संख्या अनुक्रमे ९१ , ६३ , १० अशी एकूण १६४ झाली आहे. लाखनी बालविकास प्रकल्पाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यावर असल्यामुळे त्यांना नियंत्रण ठेवणे कठीण जात असल्यामुळे लाखनी प्रकल्पात कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याबाबद बालविकास प्रकल्प अधिकारी योगिता परसमोडे यांची प्रतिक्रिया घेण्याकरिता त्यांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता झाला नाही.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular