मनोहर मेश्राम
पवनी:
गत दोन वर्षांपासून निलज-कारधा रस्त्याचे बांधकाम धीम्या गतीने सुरू असतांना साहित्याचा वापर निकृष्ठ व नियमानुसार होत नसल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्यामुळे सदर रस्ता बांधकामाची चौकशी करा अन्यथा मोठे आंदोलन उभारण्याचा गर्भित इशारा कांग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी निवेदनातून दिला.

निलज-पवनी-कारधा या महामार्गाचे बांधकाम सुरू असून याची उंची वाढल्याने गावा अंतर्गत येणारे पोचमार्ग रस्त्यात गायब झाले आहेत. फक्त काही ठिकाणी थातूरमातूर मुरूम टाकून पोचमार्ग नावापुरतेच बनविले होते. तेसुद्धा चालू पावसाळ्यात वाहून गेले आहेत. परिणामी रस्त्यालगत असलेल्या गावकऱ्यांना जाण्या-येण्यास बाधा होत असून अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते. काही ठिकाणचे बांधकाम झाले नसल्याने व केवळ रस्ता उखडून टाकल्याने जनतेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जसे वैनगंगा पूल ते बेटाळा पर्यंतचे अंतर कापतांना मोठी दमछाक होते. अनेकांना घसरगुंडी सारखे पडावे लागते. दिशादर्शक फलकाऐवजी अपघातात प्रवाशांचे जीव गेलेत. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी व राजकीय पुढाऱ्यांनी अनेकदा आवाज उठवून देखील कामाला गती येत नाही. उलट झोपेचे सोंग घेण्याच्या भूमिकेत बांधकाम यंत्रणा असल्याचे वास्तव आहे. बांधकाम यंत्रणा सामान्य जनतेच्या अडचणीकडे लक्ष न देता हेकेखोरपणे निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे. अनेक ठिकाणी मास काँक्रेटिंग न करताच नुसत्या माती मुरमावरच गिट्टी सिमेंटचा थर चढविल्याचे वास्तव नाकारता येत नाही. सदर प्रकारामुळे अल्पावधीतच रस्ता भेगा पडून फुटत चालला आहे. काही ठिकाणी तर रस्ता दबला आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. पाणी कुठे मुरते? हेच कळायला थारा नाही. सदर समस्या तात्काळ सोडवून रस्त्याचे बांधकाम पूर्ण करावे यासाठी दिनांक ९ सप्टेंबरला पवनीत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे मोहन पंचभाई यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे.
*बांधकामासाठी गौण खनिजांचा उपसा
निलज-कारधा रस्ता बांधकामात परिसरातून रेती, मुरूम, गिट्टी, तलावातून मातीचा उपसा मोठ्या प्रमाणात अवैधपणे करण्यात आला. यात रायल्टीच्या नावावर लाखो ब्रास गौण खनिजांचा उपसा करून रस्त्याच्या बांधकामात वापरण्यात आला. अनेक ठिकाणी बंजर जमिनीला तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांचीही अवैधपणे कटाई करण्यात आली. याकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नसल्याने प्रचंड प्रमाणात शासनाचा महसूल डूबत आहे. शासनाचा करोडो रुपयांचा महसूल दुबविणाऱ्या बांधकाम यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी देखील मोहन पंचभाई यांनी केली आहे.