Saturday, June 25, 2022
Homeभंडाराधडक सिंचन विहीर लाभार्थी अनुदानाचे प्रतीक्षेत

धडक सिंचन विहीर लाभार्थी अनुदानाचे प्रतीक्षेत

वर्षभरापासून अनुदान मिळाले नाही ; लाभार्थ्यांवर कर्जाचा डोंगर
लाखनी :
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होऊन आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावा. याकरिता शासन प्रयत्नशील असून सिंचन विहिरीसाठी अनेक योजना सुरू असल्या तरी आवश्यक तो निधी(अनुदान) उपलब्ध केला जात नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. धडक सिंचन विहीर लाभार्थ्यांकडून विहिरीचे बांधकाम करून घेण्यात आले. पण मागील वर्षांपासून अनुदान उपलब्ध केले गेले नसल्यामुळे लाभार्थ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने अनुदानाचे प्रतीक्षेत आहेत.


ग्रामीण परिसरातील अल्प व अत्यल्प कोरडवाहू शेतकऱ्यास सिंचनाची सोय व्हावी. वर्षभरात २ ते ३ पिके घेऊन स्वतःचा पर्यायाने देश विकासात हातभार लावून शेतकरी आर्थिक स्वयंपूर्ण व्हावा. याकरिता शासनाकडून २०१९-२० ह्या आर्थिक वर्षात धडक सिंचन विहीर कार्यक्रम राबविण्यात आला. जिल्हा जलसंधारन अधिकारी लघुसिंचन विभाग जिल्हा परिषद भंडारा चे तांत्रिक मार्गदर्शन , सनियंत्रण व देखरेखीखाली सिंचन विहिरीचे बांधकाम करावयाचे होते. तर प्रशासकीय मान्यता संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी यांचेकडून देण्यात आली व अंदाजपत्रकिय रक्कम २ लाख ५० हजार रुपये होती.
उपविभागीय जलसंधारन अधिकारी साकोली उपविभागाचे कार्यक्षेत्रात लाखनी , साकोली व लाखांदूर तालुक्याचा समावेश होत असून धडक सिंचक विहीर कार्यक्रमाअंतर्गत या तालुक्यांना अनुक्रमे ९३ , ९० , ११० अशा एकूण २९३ सिंचन विहिरींना मंजुरी प्रदान करून निवड झालेल्या लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. यातील अटी व शर्तीनुसार ३० दिवसात विहीर बांधकाम सुरू करणे बंधनकारक होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी स्वतः जवळील दागिने गहाण ठेवून काहींनी उसनवार अथवा व्याजाने रकमा घेऊन मुदतीत विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. लघुसिंचन विभागाचे अभियंत्याने याबाबद मोजमाप पुस्तिकेत नोंदही घेतली. पण वर्षभराचा कालावधी लोटून सुद्धा अनुदानाचा पत्ताच नाही. या प्रकाराने सिंचन विहीर लाभार्थ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला असताना शासन व प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तत्काळ धडक सिंचन विहिरीचे अनुदान उपलब्ध करून शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा थांबविणे गरजेचे झाले आहे.
असे होते योजनेचे स्वरूप (चौकट)
धडक सिंचन विहीर कार्यक्रमाअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या सिंचन विहिरीची अंदाजपत्रकिय रक्कम २ लाख ५० हजार रुपये असून १०० टक्के अनुदान आहे. यात ४ मीटर व्यासाची व १२ मीटर खोल विहीर तयार केल्यावर त्यात ३० मीटर इन्वेल बोअर खोदकाम करावे. असे योजनेचे स्वरूप आहे.
प्रतिक्रिया/स्टेटमेंट (चौकट)
मी एक अल्पभूधारक शेतकरी असून मला धडक सिंचन विहीर कार्यक्रमाअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करण्यात आली. उसनवार रक्कम घेऊन बांधकाम पूर्ण केले. पण अनुदान न मिळाल्याने कर्जबाजारी झालो आहे.
तुळसीदास विठ्ठल हलमारे एक लाभार्थी

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular