Saturday, June 25, 2022
Homeभंडारागाव विकासासाठी ग्रामविकास पॅनल पुन्हा एकदा मैदानात विरोधकांचे धाबे दणाणले : ग्रामस्थांचा...

गाव विकासासाठी ग्रामविकास पॅनल पुन्हा एकदा मैदानात विरोधकांचे धाबे दणाणले : ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा


भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. पहेला ग्रामपंचायत निवडणुकीकडे भंडारा तालुक्यातील जनतेचे तथा राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत. मागील पंचवार्षिक काळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर या निवडणुकीत पुन्हा एकदा ग्राम विकास पॅनलने सर्वच जागेवर आपले उमेदवार उभे केले आहे. ग्रामविकास पॅनलला पहेला ग्रामवासीयांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे.

यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून अनेकांनी आत्ताच पराभव स्वीकार केल्याचे चित्र पहेला ग्रामपंचायत निवडणुकीत दिसू लागले आहे.
भंडारा – पवनी राज्य मार्गावरील पहेला हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायत अंतर्गत नऊ सदस्य निवडून द्यायचे आहेत. ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून मागील पंचवार्षिक निवडणुकीत सुनील शेंडे यांच्या नेतृत्वात सरपंचपद मिळविले होते. सरपंच शेंडे यांनी मिळालेल्या संधीचे सोने करीत गावाच्या विकासाच्या दृष्टीने कधी नव्हे ते पाऊल उचलून गावात विकासाची गंगा आणली.
या निवडणुकीतही ग्राम विकास पॅनेलने गावाच्या विकासासाठी पुन्हा एकदा सर्वच वार्डात त्यांचे उमेदवार उभे केले आहे. ग्रामविकास पॅनलने मागील पंचवार्षिक योजनेत केलेल्या कामाच्या बळावर ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. बहुमताने सत्ता स्थापित करण्याच्या दृष्टीने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांना ग्रामस्थांनी भरघोस पाठिंबा दिल्याचे निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच दिसू लागले आहे. मतदारांचा वाढता कौल ग्रामविकास पॅनलच्या बाजूने झुकत असल्याने विरोधी पॅनेलच्या उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. पहेला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ग्रामविकास पॅनलमधून निवडणूक लढणारे सर्व उमेदवार युवा आहेत, हे विशेष. उमेदवारांमध्ये सुनील शेंडे, प्रमिला थोटे, विकास भुरले, गायत्री वैद्य, गीता वाघधरे, पद्माकर तुमसरे, रिता बोरकर, अमोल ठवकर यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांना ग्रामस्थांचे प्रचंड पाठबळ मिळत आहे.

चौकट
केलेले विकास कामे
मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर ग्रामविकास पॅनलचे सरपंच सुनील शेंडे यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेत गावाच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी खेचून आणला. त्यांनी केलेल्या विकास कामांमध्ये जिल्हा परिषद शाळा डिजिटल करून विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. ग्रामपंचायत आय एस नामांकित केली, गावाला स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियाना अंतर्गत तृतीय पुरस्कार, अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम, स्वच्छतेवर भर, पिण्याच्या पाण्यासाठी टाकीचे बांधकाम आणि प्रत्येक घराला नळजोडणी, आदर्श अंगणवाडीची निर्मिती, युवकांसाठी विशेष योजनांसाठी तरतूद, अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा, घरकुलपासून वंचितांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला. या सह मोठ्या प्रमाणात गावात विकासाची कामे खेचून आणली. यामुळेच ग्रामस्थ पुन्हा एकदा ग्रामविकास पॅनलवर विश्वास दाखवणार असे चित्र दिसू लागले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

1 COMMENT

Most Popular