Saturday, June 25, 2022
Homeभंडाराखत व बियाण्याचा तुटवडा होऊ देऊ नका - पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

खत व बियाण्याचा तुटवडा होऊ देऊ नका – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

(प्रमोद भांडारकर)
भंडारा :-

खरिप हंगाम जवळ आला असून शेतकऱ्यांना बियाणे व खतांची मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या हंगामात खत व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्या. खत व बियाण्याचा तुटवडा होऊ देऊ नका, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी कृषी विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरिप आढावा बैठकीत ते बोलत होते.


आमदार अभिजित वंजारी, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, उप निबंधक मनोज देशकर, कार्यकारी अभियंता राजेश नाईक, पणन अधिकारी गणेश खर्चे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खरिपात 01 लाख 93 हजार 700 हेक्टरवर भात व 13 हजार 800 हेक्टरवर तूर लागवडीचे नियोजन आहे. भात बियाण्याची 51 हजार 320 क्विंटल व तूर बियाण्याची 497 क्विंटल गरज असून तशी मागणी नोंदविण्यात आली आहे. खरिप हंगामासाठी 70 हजार 210 मेट्रिक टन आवंटन मंजूर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आवंटन कमी असून अधिकची मागणी नोंदविण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तुमसर येथे खताचा रॅक पॉईंट करण्याची मागणी खासदार सुनील मेंढे व आमदार राजू कारेमोरे यांनी केली. रॅक पॉइंटचा प्रस्ताव कृषी विभागाने तात्काळ पाठवावा, असे त्यांनी सांगितले.
कृषी पंप जोडण्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. सन 2021-22 मध्ये 5 हजार जोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. वीज जोडण्या प्राधान्याने देण्यात याव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. सौर ऊर्जेवर असलेले कृषी पंपाबाबत तक्रारी आहेत. त्या तात्काळ दूर करण्यासाठीचे नियोजन करा. आधारभूत धान खरेदी योजनेचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. धानाचे चुकारे अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे ते म्हणाले. उन्हाळी मका लागवडीला प्रोत्साहन देण्यात यावे. तसेच मका साठवणे व खरेदी याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात. पेरणी ते कापणी या संपूर्ण प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेही पालकमंत्री म्हणाले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular