• आरोग्य विभागाचे आवाहन
भंडारा : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी तो सात दिवसात बरा होत आहे. गृहविलगीकरण कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे आढळली तरी तातडीने कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. वेळेत निदान व योग्य उपचार यामुळे कोरोना बाधितांना लवकर बरे वाटू लागते. त्यामुळे दुखणे अंगावर न काढता वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्याने उपचार सुरू करण्यात यावा.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरवातीला ताप खोकला, वास किंवा चव जाणे अशी सौम्य लक्षणे दिसत होती. पहिले चार दिवस उलटल्यावर ऑक्सिजन पातळी कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, फुप्फूसामध्ये संसर्ग वाढणे असे त्रास वाढीस लागत होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोना बाधितांमध्ये घसा खवखवणे, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा अशा सौम्य किंवा मध्यम लक्षणे पहायला मिळत आहेत. पाच-सात दिवसांमध्ये लक्षणे कमी होऊन सात दिवसात रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत. ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, अंगदुखी, श्वास घ्यायला त्रास होणे, धाप लागणे, वास न येणे, चव न लागणे अशी लक्षणे आढळून आल्यास स्व-चाचणी, रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट किंवा RTPCR तपासणी करून घेणे.
घरी रहा, हात निर्जंतुक करा, विलगीकरणात रहा आणि विश्रांती घ्या, कुटूंबातील सर्व सदस्यांनी मास्कचा वापर करा, घरात हवा खेळती राहू द्या, पाणी, सुप, फळांचा रस, नारळपाणी व भरपेट आहार घेणे. शरीराचे तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण मोजा (दर 6 तासांनी) घरी काळजी घेताना रेमडेसिवीरचा वापर करू नका. नेबुलायझरचा (वाफयंत्र) वापर ब्युडोसोनाइड औषध घेण्यासाठी करू नका, ऑक्सिजन सिलेंडरचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सिटी स्कॅन करू नका, स्वत: औषधोपचार घेऊ नका, असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी कळविले आहे.