Tuesday, June 28, 2022
Homeभंडाराकेंद्र सरकारची भूमिका ओबीसी वर्गाला उध्वस्त करणारी : भानुदास माळी

केंद्र सरकारची भूमिका ओबीसी वर्गाला उध्वस्त करणारी : भानुदास माळी

भंडारा येथे काँग्रेस ओबीसी विभागाची बैठक

भंडारा:

केंद्र सरकारने ओबीसी बांधवांबद्दल कायम दुटप्पीपणाची भूमिका घेतली. ओबीसींचे आरक्षण असेल किंवा अन्य समस्यांबद्दल फक्त आम्ही समस्या सोडवत आहोत असं देशाला भासवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षात समस्या सुटल्या पाहिजेत असे कुठलेही प्रयत्न केंद्र सरकारने केले नाहीत आणि म्हणून याचा फटका ओबीसी समाजाला बसलेला आहे. ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी आणि अन्य गोष्टींबाबत केंद्र सरकारने ओबीसींना न्याय द्यावा यासाठी 1 लाख लोकांचा मोर्चा दिल्ली येथील जंतर मंतर वर काढण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले. विधानसभा अध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीने ओबीसी जनगणनेचा ठराव मांडला आणि मंजूर करून घेतला हे अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार देखील त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याबद्दल काढले.

महाराष्ट्र दौऱ्यावर असताना भंडारा येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर त्यांच्यासह आमदार अभिजीत वंजारी, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, प्रदेश महासचिव प्रमोद तितिरमारे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष रविभूषण भुसारी, राज्य दौरा समन्वयक संतोष रसाळकर, धनगर समाजाचे नेते भगवान कोलेकर, नागपुर जिल्हा परिषदेच्या सदस्य अवंतिका लेकुरवाळे, इंटकचे भंडारा जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, भंडारा शहर काँग्रेस अध्यक्ष प्रशांत देशकर, भंडारा तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अवैस पटेल, राजुभाऊ पालीवाल, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, मार्कंड भेंडारकर, सोशल मिडीया विभाग जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघाये आदी मान्यवर उपस्थित होते.

ओबीसी समाजाच्या सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राज्य सरकार करत आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी देखील वेळोवेळी ओबीसी समाजाची बाजू लावून धरली असे आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितले. देशात सर्वाधिक संख्येने असलेल्या ओबीसी समाजाबद्दल विद्यमान केंद्र सरकारने कायमच द्वेष बाळगला आणि जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही कसे ओबीसी समाजाचे हितचिंतक आहोत असे सांगण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले तसेच यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत, हा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच “व्यर्थ न हो बलिदान” या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याचा, त्यागाचा, बलिदानाचा इतिहास लोकांपर्यंत, गावागावा पर्यंत पोहोचवण्याचे काम काँग्रेस पक्ष करेल असे देखील त्यांनी सांगितले. हळू हळू म्हणजे गेल्या सात वर्षात पद्धतशीरपणे वेगवेगळ्या शासकीय संस्था किंवा उद्योग पद्धतशीरपणे विकण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने सुरू केलेला आहे आणि यामुळे भविष्यात सर्वसामान्य लोकांचं जगणं कठीण होणार आहे म्हणून वेळीच सावध झालं पाहिजे आणि एकजुट होऊन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन आपलं सरकार आनुया असे प्रतिपादन राज्य दौरा समन्वयक संतोष रसाळकर यांनी केले. आपले अधिकार प्राप्त करण्यासाठी आपण लढा दिला पाहिजे आणि प्रसंगी जी व्यवस्था आपल्याला न्याय मिळू देणार नाही त्या व्यवस्थेशी संघर्ष करण्याची तयारी आपण ओबीसी बांधव म्हणून ठेवली पाहिजे असे प्रतिपादन अवंतिका लेकुरवाळे यांनी केले.

या सभेला जिल्ह्याच्या विविध भागातून काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular