Tuesday, June 28, 2022
Homeनागपुरसिर्सी गावाला डेंग्यू चा विळखा

सिर्सी गावाला डेंग्यू चा विळखा

डेंग्यू ने १० वर्षाचा मुलाचा बळी

विदर्भ कल्याण/ पुंडलीक कामडी
सिर्सी: यावर्षी तुरळक झालेला पाऊस, दिवसभर ऊन, अधामधात येणारे बादल, अपुऱ्या पावसामुळे वाहून न गेलेला कचरा यामुळे ग्रामीण भागात साथीच्या तापाचे रुग्ण वाढत आहेत. प्रत्येक घरी हिवताप, ताप, अंगदुखी चे रुग्ण दिसून येत आहे. यामधेच सिर्सी गावात डेंग्यू चे रुग्ण वाढत आहे. आज एका मुलाचा डेंगूमुळे मृत्यू झालेला असून त्यामुळे संतप्त नागरिक येथील प्रशासनाला दोष देताना दिसून येत आहे.


सारंग विलास नागपुरे वय १० वर्ष या मुलाचा मृत्यू डेंगूमुळे झाला आहे. मागील आठवड्यात येथील प्रा. आ. केंद्रातून त्याला समोरच्या उपचारासाठी रेफर केले होते. त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
यावेळेस गावातील बरीच लोक या ठिकाणी उपस्थित होती. गावात डेंगू चे रुग्ण वाढण्याकरिता येथील प्रशासन जबाबदार आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. कित्येक तक्रारी करूनसुद्धा येथील प्रशासन लक्ष देत नाही. गावातील मोजक्याच ठिकाणी आणि काही अतिविशिष्ट लोकांच्याच घरासमोरील नाल्या उपसण्यात आलेल्या आहेत. बहुतेक पाऊस आल्यामुळे नाल्या आपोआपच साफ होऊन जाईल असे कदाचित त्यांचे म्हणणे असेल अशी संतप्त प्रतिक्रिया येथील लोकांनी दिलेल्या आहेत. ग्रामपंचायत कडून कोणत्याही प्रकारची फवारणी किंवा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत नाही अशे लोकांकडून सांगण्यात आले आहे. यावेळेस गावातील प्रकाश बुरे, आबिद शेख, नरेंद्र मेहरकुरे, अनिल फटींग, सुरेश मडावी, प्रवीण पराते, बापू ठाकरे, शेखर सुटे, सचिन बावनकार यांनी आपल्या व्यथा सांगितल्या.
याविषयी प्रा. आ. केंद्र सिर्सी चे वैधकीय अधिकारी डॉ. आशिष सोनुने याना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की येथील आरोग्याविषयी सर्व माहिती गोळा करून व वारंवार आवश्यक त्या सूचना आम्ही ग्रामपंचायत कडे देत असतो. गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे येथील ग्रामपंचायत चे काम आहे, त्यांनी ते करायला पाहिजे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular