विदर्भ कल्याण / पुंडलिक कामडी
सिर्सी: काल सायंकाळ पासून गावाच्या शेतशिवारात काहीतरी घटना घडल्याची चर्चा रंगली होती. पण नेमकी काय ते कोणीही स्पष्ट सांगत नव्हते. काही शेतकऱ्यांनी व लोकांनी हिम्मत करून नाव समोर न येण्याच्या अटीवर सांगितले की एका शेताच्या बाजूला काही लोकं व पोलिसांसारखा पोशाख घातलेले व्यक्ती उभे होते व दोन मोठे जंगली जानवर तिथे मरून पडले असल्याची माहिती त्यांनी दिली.
याविषयी काही फोटो व व्हिडिओ विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क कडे प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आम्ही दूरध्वनी वरून संपर्क केला असता आम्हाला याविषयी काही कल्पना नाही व ते क्षेत्र एफ.डी.सी.एम. कडे येत असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा एफ.डी.सी.एम. च्या कर्मचाऱ्यांना आम्ही दूरध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी सुद्धा याविषयी आम्हाला सध्या माहिती नाही व माहिती काढून सांगतो असे सांगितले. नंतर काही तासाने एफ.डी.सी.एम चे वन परिक्षेत्र अधिकारी योगेश खोडनकर यांना संपर्क केला असता त्यांनी मी गावात नाही आहो, तिथे रोही मेलेले आहेत व त्याचा पंचनामा परिक्षेत्र अधिकारी एस. एन. केंद्रे यांनी केला आहे व ते माहिती देतील असे सांगितले. परिक्षेत्र अधिकारी एस.एन. केंद्रे यांनी दूरध्वनी वरून माहिती देतांना सांगितले की त्याठिकाणी दोन रोही मरून पडले होते आम्ही पंचनामा केलेला आहे त्यानुसार कुत्र्यांनी त्या रोह्यांना चावा घेतल्याने व फाडल्याने त्यांचा मृत्यू झाला. नुसता कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यू होईल का असे विचारले असता रोही हे खूप भित्रे असतात व कुठे नुसते गुंतले तरी भीतीपोटी मारतात असे त्यांनी सांगितले.
आमचेकडे प्राप्त झालेल्या विडिओ व फोटो नुसार त्या दोन्ही रोह्यांच्या अंगावर जखमेच्या काहीच खुणा सुद्धा नव्हत्या. त्या रोह्यांना कुठे चावा घेतला किंवा कुत्र्यांनी फाडले असे सुद्धा दिसून येत नाही. त्यांना बाजूच्या शेतातून फरफटत नाल्यात आणले आहे असे दिसून येत आहे व त्या फरफटत आणल्याचे स्पष्ट निशाण फोटो व विडिओ मध्ये दिसून येते. असे परीक्षेत्र अधिकारी केंद्रे यांना सांगितले असता नंतर त्यांची जीभ पालटली ते रोही विद्युत करंट ने सुद्धा मेलेले असू शकतात असे ते सांगू लागले व आम्ही पुन्हा याचा तपास करतो व बाजूच्या शेतकऱ्यांचे बायन घेतो असे सांगितले. पंचनामा करताना कोणताही पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत नव्हता अशी सुद्धा माहिती मिळत आहे. परिक्षेत्र अधिकारी केंद्रे यांनी स्वतःच पंचनामा केला व त्या दोन्ही रोह्यांना गड्डे खोदून पुरण्यात आले असे त्यांनी स्वतः सांगितले आहे.
लोकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार याठिकाणी प्रकरण दाबण्यासाठी खूप मोठे सेटलमेंट झाले असल्याचे बोलले जात आहे ( विदर्भ कल्याण या गोष्टी ची पुष्टी करत नाही ) . नेमके खरे काय नी खोटे काय याचा शोध घेणे आवश्यक आहे. व सत्य परिस्थिती समोर यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया गावकरी देताना दिसून येत आहे.