पत्रकारास शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक यांना निवेदन
विदर्भ कल्याण न्युज
सावरगाव:-
नरखेड तालुका मराठी पत्रकार संघ,नरखेड येथील पत्रकार यांनी आज वृत्तपत्रकारिता प्रतिक्रिया मागितली असता अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी याकरिता पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन नरखेड यांना आज दिनांक 06/07/2023 ला निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहिती नुसार मंगळवार दिनांक 04/07/2023 ला ट्रायअम्प कॉन्व्हेंट,सावरगाव ची शिक्षण विभागाने परवानगी नाकारल्यामुळे पन्नास ते साठ पालक शाळा सोडल्याचा दाखला मागण्याकरिता जमा झाले होते. शाळा व्यवस्थापन समिती पाल्यांचा दाखला देत नसल्यामुळे काही पालकांनी काही पत्रकार मंडळींना पेपरला वार्ता देण्याकरिता फोन करून बोलावले.त्यावेळी तिथे योगेश गिरडकर सहदेव वैद्य व लक्ष्मीकांत पटेल वृत्त संकलन करण्याकरिता गेले होते.
तिथे गेले असता मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते तसेच ट्रायअम्प कॉन्व्हेंट सावरगाव बंद अवस्थेत दिसून आले.त्यावेळी प्रत्यक्षदर्शी पालकांनी सांगितले की यावर्षी सदर ट्रायअम्प कॉन्व्हेंट ला शिक्षण विभागाची परवानगी नसल्यामुळे बंद आहे व त्यामुळे आम्ही सर्व पालक टी.सी.ची मागणी आम्ही करीत असून आम्हाला गेल्या पंधरा दिवसापासून कॉन्व्हेंटला चकरा माराव्या लागत आहे.त्यामुळे तुम्ही याबाबतची बातमी तुमच्या वृत्तपत्रात प्रकाशित करा असे सांगितले.
त्या संबंधित बातमी पत्रकारांनी बनवली व या बातमी करिता लागणारी प्रतिक्रिया मिळावी म्हणून संबंधित संस्थेचे संचालक श्री बंडू तागडे यांना सावरगाव येथील पत्रकार श्री योगेश गिरडकर यांनी त्यांच्या मोबाईल वर सहा वाजताच्या दरम्यान संपर्क साधला परंतु त्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे त्यांना व्हाट्सअप मेसेज व टेक्स्ट मेसेज केला.दोन तासांनी आठ वाजताच्या दरम्यान बंडू तागडे यांनी फोन केला व कशासाठी फोन केला होता असे विचारले तर पत्रकार श्री.योगेश गिरडकर यांनी त्यांना सांगितले की,आज तुमच्या ट्रायअम्प कॉन्व्हेंट येथे पालक आले होते व ते बंद असल्यामुळे टी.सी.ची मागणी करीत होते. तसेच आम्हाला बातमी देण्याविषयी म्हणाले म्हणून त्यावर तुमची प्रतिक्रिया घेण्याकरिता फोन केला होता.
तर यावर त्यांनी प्रतिक्रिया न देता चिडून जाऊन माझ्या कॉन्व्हेंट ची बातमी देतो का असे म्हणत जातीवाचक,अश्लील शिवीगाळ केली तसेच आई बहिणी विषयी अपशब्द वापरले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.सदर व्यक्ती पासून आमच्या पत्रकाराच्या जीवाला धोका असल्यामुळे त्याच रात्री दिनांक 04/07/2023 ला रात्री नऊ वाजताच्या दरम्यान सावरगाव पोलीस चौकीला तक्रार दिली.
तरी याबाबत सविस्तर चौकशी करून पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करावी अश्या आशयाचे निवेदन नरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी यांना दिले.
निवेदन देतेवेळी सिताराम रेवतकर,विजय डोंगरे,अशोक ढोके, श्याम नाडेकर,महेश मोहने,योगेश गिरडकर,सहदेव वैद्य,योगेश चौरे,सुनील मोहोड,संजय वाळके,हरीश कडमधाड,गौतम पंचभाई,पवन कळंबे,राजेंद्र बागडे,श्रीकांत मालधुरे,सुनील बरोले,दिपक नवडती आदि पत्रकार उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन उपस्थित पत्रकारांना दिले.