पुंडलीक कामडी
सिर्सी: मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचा महत्वाचा सण पोळा यावर कोरोनामुळे प्रतिबंध घालण्यात आले होते. यावर्षीही खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना घरीच पोळा साजरा करण्याचे आवाहन केले होते. शेतकऱ्यांनी ही वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची कृतघ्नता म्हणून पोळा सण साधेपणाने पण तितक्याच उत्साहाने साजरा केला.

शेतकऱ्यांच्या घरी सकाळ उजाडताच पोळा या सणाची लगबग दिसून आली . शेतकऱ्यांनी बैलांना स्वच्छ धुवून त्यांना सजवण्याचे काम सुरू करणे. यामध्ये शेतकरयांच्या घरच्या इतर सदस्यांनी ही तितक्याच उत्साहाने तयारी करण्याचे काम केले. तयारी सुरू असताना त्यांच्या मनात उत्साह दिसून येत होता पण सोबत पोळा भरणार नसल्याने एक चिंता पण दिसून येत होती. शेवटी सायंकाळ होताच शेतकऱ्यांनी आपली सजवलेली बैलं गावातील हनुमान मंदिरात पूजेकरिता नेली. सर्व शेतकऱ्यांचा हा पूजेचा कार्यक्रम सुरू असताना गावात पोळ्याच्या सणासारखेच आनंदाचे व उत्साहाचे वातावरण बनत गेले. रस्त्यावरून सजवलेले बैलं जात असताना गावकऱ्यांना सुद्धा आनंद येत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बांध असल्यामुळे लोकांनी साधेपणाने फक्त मंदिरात बैलाची पूजापाठ करून साधेपणा जपला. गावकऱ्यांनी पण रस्त्यावरून जाणाऱ्या बैलांची घरी बोलावून पूजा केली व शेतकऱ्यांना बोजारा दिला. यामुळे पूर्ण गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरवर्षी सिर्सी गावात दोन मुख्य पोळे भरवले जातात. या पोळ्यात प्रथेप्रमाणे गावातील निवृत्त पोलीस पाटील श्री. रामभाऊजी नागपुरे यांच्या बैलजोडीला मानाचे स्थान असते. त्यांची बैलजोडी पोळ्यात आल्याशिवाय पोळा पूर्ण होत नसतो. ही मानाची बैलजोडी पोळ्यात आल्यावरच पोळा फुटतो म्हणजेच पोळ्याची सांगता होते. यावर्षी पोळा भरणार नसल्याने या मानाच्या बैलजोडी ला घरीच सजवण्यात आले व पूजेकरिता मंदिरात नेण्यात आले. हा प्रसंग बघून शेतकऱ्यांनी या मानाच्या बैलजोडीला आपल्या घरी नेण्यास सुरुवात केली व श्रद्धेने बैलजोडीला पूजन घातले. यानिमित्याने यावर्षीचा पोळा सफल झाल्याची भावना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. कोरोना निर्बंधांचे पालन करून साधेपणाने सिर्सी गावात पोळा साजरा करण्यात आला यांची गावात व परिसरातील गावात उत्साहपूर्ण चर्चा रंगली होती.