मांढळ ( प्रतिनिधी):
गोसेखुर्द प्रकल्पा मध्ये पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यात आल्याने कूजबा येथून वाहणाऱ्या आमनदीला धरणाच्या ‘ बॅकवॉटर ’ ने पाण्याच्या पातळी मध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रोज जीव धोक्यात घालून साचलेल्या पाण्यातून जावे लागत आहे. त्यासाठी नावेचा वापर केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही.गोसेखुर्द प्रकल्पाच्या बाधीत गावांचे पुनर्वसन करण्याची गरज असली तरी अद्याप पर्यंत लोकप्रतिनिधींची अनास्था असल्याची संसप्त भावना कुजाबा निवासी शेतकरी सुरेश कुकडे ,सचिन भगत, राहुल रघोर्ते,यांनी व्यक्त केली आहे.

रोजच्या शेत कामासाठी कुजबा येथील महिला बॅक वॉटर मधून जाण्यासाठी नावेतून प्रवास करीत असताना नाव तुटल्याने हा अपघात घडला. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून उर्वरित गंभीर स्थितीत कुही व नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मृतक महिलेचे नाव गीता रामजी निंबर्ते वय २८ वर्षे आहे. गंभीर स्थितीत असणाऱ्या अपघात ग्रस्तांमध्ये मोनू सुरेश साळवे ( वय २८ वर्षे), मनीषा राजू ठवकर ( वय ३५ वर्षे), लक्ष्मी गिरी ( वय ३७ वर्षे), मंगला देवराव भोयर ( वय ३६ वर्षे), परमानंद देवराव भोयर (वय ३६ वर्षे) यांचा समावेश आहे. ही घटना वेलतुर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून अपघात ग्रस्तांना मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता अत्यवस्थ अवस्थेत असणाऱ्या रुग्णांना प्रथमोचार करून पुढील उपचाराकरिता कुही येथील ग्रामीण रुग्णालय व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन राठोड यांनी सांगितले. मृतकाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह कुही ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
कुजबा गावाचे पुनर्वसन व्हावे अशी स्थानिकांची मागणी असली तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी केवळ जनतेच्या मागणीला विशेष महत्त्व देत नसून या पद्धतीचा त्रास गेल्या काही काळापासून स्थानिक शेतकऱ्यांना सहन करीत राहावे लागत आहे.नुकताच या समस्येसाठी भाजप कडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता परंतु आंदोलन सुरू करण्याच्या च पूर्वी अपघाताने समस्येला अधिक अधोरेखित केले आहे. मांढळ प्रा. आ. केंद्राला उमरेड चे आमदार राजू पारवे, भागेश्र्वर फेंडर यांनी भेट दिली.भाजप चे रोहित पारवे, स्वप्नील राऊत, संदीप सुखदेवे, राजेश तीवस्कर यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप चे कार्यकर्ते शांततेत झालेल्या प्रकाराची माहिती घेत असताना पोलिसांनी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला असता स्वप्नील राऊत भाजप तालुका महामंत्री यांची उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड यांच्यासोबत शाब्दिक चकमक देखील बघायला मिळाली.