साप दिसला की प्रत्येकाचीच घाबरगुंडी उडते, अंगावर काटा उभा राहतो, मनामध्ये भिती निर्माण होते. त्यावेळी नेमकं काय करावं काही सुचत नाही. पण काही ठिकाणी मात्र सापालाही बळी पडावे लागते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. आता अनेक ठिकाणी, अनेक शहरात, गावात सर्पमित्र आहेत. ते सापाचे रक्षण करण्याचे काम करीत आहेत. काल वरोरा येथील जाजू हॉस्पिटलमागे एका घरी सर्पमित्राने नागाचे प्राण वाचवून त्याला जीवदान दिले. त्यामुळे सर्पमित्र आणि त्याच्या टीमचे कौतुक होत आहे.

त्याचं असं की वरोरा येथील जाजू हॉस्पिटलच्या पाठीमागे पुरूषोत्तम मोडक काकाजी यांचे घर आहे. काल रात्री आठच्या सुमारास सौ. काकू अंगणात काम करीत असतांना त्यांना एक साप आढळून आला. ही बाब काकूंनी मुलगा सागरच्या लक्षात आणून दिली. घरी साप असल्याची बातमी त्यांच्या घरी राहत असलेल्या भाडेकरूंनाही समजली. सागर आणि त्यांच्या भाडेकरूनी लगेच सर्पमित्राला फोन घुमवला. सर्पमित्र विशालभाऊ ढोक आपल्या टीमसह मोडक यांच्या घरी वेळ न दवळता हजर झाला. लगेच साप शोधण्याची मोहीम त्याने सुरू केली.
विशाल आणि त्याच्या टीमनी संरक्षण भिंतीच्या आजूबाजूंनी साप शोधायला सुरूवात केली. पण सापाचा काही थांगपत्ता लागला नाही. या ठिकाणचा साप बाहेर गेला, असावा असा अंदाज सर्पमित्र टिम आणि उपस्थितांना घेतला. पण मोडक काकूंना साप याच ठिकाणी असल्याचा विश्वास होता. मग इतरांनाही साप शोधायला सुरूवात केली. मोडक यांच्या घराच्या परिसरात लिंबाचं झाड आहे. या झाडावर तर साप चढला नसावा ना? असाही अंदाज सारेच घेऊ लागले. त्यानंतर झाडावर साप शोधण्याची मोहीम सुरू झाली. काही लोकं घरावर चढले. अन् विशाल आणि त्याची टिम झाडाच्या खालून साप शोधू लागले. पण साप काही दृष्टीस पडत नव्हता. त्या लिंबाच्या झाडाला उपस्थितांपैकी एकानी हालवले. झाड हालवल्यानंतर साप फांदीवरून डोकावू लागला. आणि त्याने आपला फणा काढला. तो साप नाग आहे आणि लिंबाच्या झाडावरच असल्याची खात्री झाली. विशाल सापाला पकडण्यासाठी घरावर चढला. त्याने नागाला पकडण्यासाठी यू स्टिक मदतीने प्रयत्न केला. पण नाग खाली जाऊ लागला. त्यानंतर विशालनी खालून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो काही सापडला नाही. विशाल आणि टिमचं खाली-वर जाणं दोन-तिनदा झालं. पण नाग काही मिळाला नाही. जिद्दी विशालनेही आपली हिंमत हारली नाही.
पुन्हा नागाने झाडाच्या वरच्या फांदीवर कुच केली. विशालनी त्या नागाचा वेध घेतला. तात्काळ तो पुन्हा वर गेला. घराच्या वर जाऊन विशालनी नागाचा वेध घेतला. याठिकाणी नाग पकडू शकतो, असे विशालनी मनाशी ठाम ठरवले. जीवाची पर्वा न करता मोठ्या शिताफीने त्या नागाला विशालनी पकडले. त्याला खाली आणले. नाग साप चार-साडेचार फूट लांबीचा होता. त्यानंतर डब्यात त्या नागाला कैद केले. आतापर्यत शेकडो सापांना जीवदान दिले. या नागाला जंगलात सोडून देणार असल्याचे विशालनी यावेळी सांगितले. सापाला मारू नका, तो आपला मित्र आहे. पर्यावरणाचे रक्षण करतो. साप कधी कुठेही निघाल्यास मला कळवा, मी आणि माझी टिम अवश्य सेवेस तत्पर राहील, हे ही विशाल सांगायला विसरला नाही. शेकडो सापांना जीवदान देणाऱ्या आणि निसर्गाचं रक्षण करणाऱ्या विशाल आणि टिमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ।