ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्था…
*धुळीने माखली शेतीतील उभी पिके
विदर्भ कल्याण
राजुरा : बल्लारपूर वेकोलि अंतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील कोळसा खाणीतून जड वाहतुकीमुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले उभे पीक पूर्णपणे काळे पडले आहे. रस्त्यात पाणी तुंबणार नाही, ओव्हरलोड कोळशाची वाहतूक केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन गोवरी- पवनी यांनी दिले आहे. मात्र वेकोलिला त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे गोवरी येथील शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून वेकोलीची कोळसा वाहतूक बंद केली.
राजुरा तालुक्यातील गोवरी-पोवनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड कोळशाची वाहतूक होत आहे. कोळशाची वाहतूक जास्त असल्याने या मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रस्त्यालगतची पिके पूर्णपणे काळी पडली असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. ताडपत्री न झाकता भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनातून कोळशाचे तुकडे रस्त्यावर पडल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी प्रज्योत चिड्डे, बंडू माशरकर, नानाजी दरेकर, मंगेश दरेकर, रामदास देवलकर, शुभम खवसे, करण माशरकर, लहू दरेकर, प्रफुल्ल दरेकर, रुद्रकर दरेकर, जिबला बोबडे व गौरी येथील ग्रामस्थांनी वेकोलि कोळशाची वाहतूक बंद पाडली.दरम्यान पाण्याच्या टँकरने रस्त्यावर पाणी मारल्या नंतर कोळसा वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
नागरिक चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत
वेकोलिमार्गे ओव्हरलोड कोळसा वाहतूक जीवघेणी ठरत असून, वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा ग्रामस्थांना ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे वेकोलिच्या नियोजनशून्य कारभारावर नियंत्रण कोण ठेवणार? असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.