चंद्रपूर– गांधीजींच्या विचारातून प्रेरणा घेत वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून प्रशिक्षण प्राप्त केलेल्या ज्येष्ठ गांधीवादी स्वर्गीय कृष्णमुर्ती मीरमीरा यांनी स्थापन केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती च्या ग्रामोदय संघ या देशी कुंभार प्रशिक्षण केंद्राला केंद्रीय मध्यम लघु उद्योग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी आज भेट दिली.

या प्रशिक्षण केंद्रात आज पासून सुमारे दोन कोटी रुपये खर्चून नव्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चा शुभारंभ करण्यात आला. देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण कुंभार कारागीर या प्रशिक्षण केंद्रात दरवर्षी येत असतात. रेड क्ले पॉटरी अर्थात टेराकोटा आर्टिकल्स च्या निर्मितीसाठी हे केंद्र देशभरात नावाजलेले आहे. आजपासून या केंद्रात देशभरातील रेड क्ले पॉटरी संदर्भातील कौशल्य प्रशिक्षणाला प्रारंभ झाला.
1956 साली स्थापन झालेल्या ग्रामोदय संघ भद्रावतीच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून कार्यक्रमात दहा कोटी रुपये मंजूर केले. कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील रोजगार निर्मिती साठी केंद्र सरकार प्रतिबद्ध असून इथून प्रशिक्षित झालेल्या कामगारांनी आपल्या गावी जात रोजगार सुरू करत अधिक हातांना काम द्यावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ग्रामोदय संघ भद्रावतीच्या नव्या सुसज्ज इमारतीचा मास्टर प्लॅन आखून येथे वसतिगृहासकट सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या.
भद्रावती चे नाव रेड क्ले पॉटरी अर्थात टेराकोटा आर्टिकल निर्मिती संदर्भात जागतिक स्तरावर घेतले जावे अशी भावना गडकरी यांनी आपले संबोधनात व्यक्त केली. गडकरी यांनी आपल्या भेटीदरम्यान इथले कारागीर आणि व्यवस्थापन यांच्याशी अडचणींबाबत आस्थेने संवाद साधला.