Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरजिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज

जिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज


कोरानाविरूद्ध लढाईत जिल्हा प्रशासनाचे काम कौतुकास्पद – जि.प.अध्यक्षा गुरनुले

चंद्रपूर, दि. 16 जानेवारी : चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना लसीकरण केंद्रावर आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोज देण्यात आला व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, नागपूर येथील आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.श्रीराम गोगुलवार, वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, आय.एम.ए. चे डॉ. अनिल माडुरवार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
कोविड कालावधीत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी एकजुटीने जिल्हा प्रशासनाच्या पाठीशी होते. तसेच कोरोनाविरूद्धच्या लढाईत आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सर्व शासकीय कर्मचारी यांनी स्वत:ला झोकुन देऊन चांगले काम केले असून त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी यावेळी व्यक्त केले.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील 16 हजार 524 कोरोना योद्धांना कोविशिल्ड लसीसाठी नोंदणी करण्यात आली असून त्यांना टप्प्याटप्प्याने लस देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले. आज चंद्रपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर व पठाणपुरा आरोग्य केंद्र तसेच वरोरा, ब्रम्हपुरी व राजुरा या सहा केंद्रांवर लसीकरणाची सुरूवात करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थींचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लस कुठे द्यावी, कधी द्यावी याबाबत सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सर्वांच्या समन्वयाने जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.
आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम प्रशासनाच्या माध्यमातून 100 टक्के यशस्वी होईल, असे सांगून कोरोना लसीकरणाला शुभेच्छा दिल्या. तर आयएमएचे डॉ. अनिल माडुरवार यांनी कोरोना काळात सर्व सामान्यजन घाबरत असतांना डॉक्टर मात्र कर्तव्यापासून मागे हटले नाही, जिल्हा प्रशासन पाठीशी असल्याने डॉक्टरांना कोरोनाविरुद्ध लढण्यास बळ मिळाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन आरोग्य अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके यांनी केले.*जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांना यावेळी सर्वप्रथम लस देण्यात आली. पारिचारिका सुरेखा सुतराळे यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोज त्यांना दिला. तसेच लस घेतल्यावरही वारंवार हात धुणे, मास्क वापरने व सामाजिक अंतराचे पालन करणे इ. कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना त्यांनी सोनारकर यांना केल्या. यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून डॉ. सोनारकर यांचे अभिनंदन केले. तर भास्कर सोनारकर यांनी जिल्ह्यातून सर्वप्रथम लस मिळत असल्याबाबत आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच या लसीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसून इतर लाभार्थ्यांनीदेखील यापासून प्रोत्साहन घ्यावे, असे मनोगत लस घेतल्यानंतर व्यक्त केले.* यावेळी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, कार्यक्रम व्यवस्थापक श्रीनिवास मुळावार, शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील प्राध्यापक डॉक्टर, आरोग्य सेवक तसेच लसीकरण अधिकारी चंदा डहाके, सुरेश लडके, अक्षय शास्त्रकार, धनश्री मेश्राम, डॉ. वेनकांत पंगा इ. उपस्थित होते.

000

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular