चंद्रपूर:-

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीला कसे सोडविणार या प्रश्नाच्या उत्तरात थेट कॉग्रेसमध्ये विचारांची नव्हे तर अस्तितवाची गटबाजी आहे, असे मिश्किल उत्तर देत पक्षातील सर्व गटातटाच्या लोकांना सामावून घेण्याचा संदेश दिला. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आज चंद्रपूर दौऱ्यावर असताना येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांचे समवेत पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा थानोरकर, आमदार सुभाष धोटे, बँकचे अध्यक्ष संतोष रावत, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष राम तिवारी, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भाचा दौरा करण्यामागील उद्दिष्ट सांगताना म्हणाले की, राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढला असताना त्यावर काँग्रेस पक्षाकडून झालेल्या कार्याचा आढावा घेणे, तसेच विकासात्मक मुयांचा अभ्यास करणे आणि भविष्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी संघटनात्मक मजबुती आवश्यक आहे. त्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. हा दौरा आटोपल्यावर थेट जिल्हा पातळीवरील संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे यात काँग्रेस घटक पक्ष आहे. मग काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलेल्या घोषणा मुख्यमंत्री फिरवित असतात त्यामुळे या समन्वयाचा अभाव आहे का? असा प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत. त्यांना काही फेरबदल करण्याचे अधिकार असतात. त्यामुळे समन्वय नाही असा त्याचा अर्थ नाही असे म्हणत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार मजबूत आहे. विरोधकांनी काळजी करू नये असा टोला लगावला. विजय वडेट्टीवार यांनी अनलॉक संदर्भात केलेली वक्तव्य मुख्यमंत्री कार्यालयाकडून फिरवण्यात आले व पुन्हा दोन दिवसांनी वडेट्टीवार जे बोलले तेच मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. मग वडेट्टीवार यांचे काय चुकले असा प्रश्न उपस्थित केल्यावर प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री प्रमुख या नात्याने फेरबदल करू शकतात असे सावय उत्तर देवून सरकारमध्ये चांगला समन्वय असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.