Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रसलग दुसऱ्या शैक्षणिक वर्षावर कोरोनाचे सावट

सलग दुसऱ्या शैक्षणिक वर्षावर कोरोनाचे सावट

गतवर्षी कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरळीतपणे सुरु होईल असे वाटत होते मात्र अद्यापही कोरोनाचा धोका कायम असल्याने यावर्षीचे शैक्षणिक वर्षही वाया जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात १५ जुन पासुन शाळा तर सुरु झाल्या आहेत मात्र शाळेत केवळ शिक्षकांची उपस्थिती आहे. एकीकडे येत्या १५ ते २० दिवसात परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे विधान राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे तर दुसरीकडे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन बहुतांश शाळांनी अॉनलाईन शिक्षणाची तयारी सुरू केली आहे.


गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे निम्मे शैक्षणिक वर्ष वाया गेले होते. शैक्षणिक वर्षाला सुरूवात होवूनही शाळा बंदच होत्या. शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना अॉनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले होते. महाराष्ट्रातील काही भागात या कालावधीत विद्यागम योजना सुरू करण्यात आली होती. विद्यागम सुरु असताना अनेक शिक्षकांचा कोरोनामुळे बळी गेला होता. त्यामुळे शासनाने विद्यागमला तात्पुरती स्थगिती दिली होती. गतवर्षी तब्बल ९ महिन्यानंतर शाळा सुरू झाल्या ख-या मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने त्या जास्त काळ चालल्या नाहीत. कोरोनाची परिस्थिती पाहता १० वी व १२ वी वगळता पहिली ते नववीच्या परिक्षा रद्द केल्या होत्या. एप्रिल मध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने १० वी व १२ वी च्या परिक्षाही रद्द करुन या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनावर आधारावर पास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गतवर्षीचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता याही वर्षी शाळा लवकर सुरू होतील असे वाटत नाही. त्यामुळे यावर्षीचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होणार की नाही याबाबत पालकांना सांंशकता आहे. शाळांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अॉनलाईन शिक्षणाची तयारी सुरू केली असली तरी या शिक्षण पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन किती प्रमाणात होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. एका अनुमानानुसार भारतात जवळपास २५ कोटी शालेय विद्यार्थी आहेत.तर महाविद्यालयात आणि उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ७ ते ८ कोटी आहे. एकूण मिळुन ३२ ते ३३ कोटी विद्यार्थी आहेत. ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या बरोबर आहे. कोरोनाने या ३३ कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर खूप वाईट प्रभाव टाकला आहे. एकूण शिक्षण व्यवस्थाच कोलमडली आहे. जवळपास १ वर्षापासून हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत. ते आपआपल्या घरात कैद आहेत. आज विद्यापिठ, शाळा, महाविद्यालयांमार्फत झूम, गूगल मीट, वेबऐक्स, माईक्रोसॉफ्ट टीम सारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी केला जाणार आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, हा उपाय खरंच सर्वसमावेशक आहे का ? ऑनलाईन शिक्षण वर्गातील शिक्षणाची बरोबरी करू शकते? हा पर्याय भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीला अनुकुल आहे? निश्चितच याच उत्तर शोधल असता ते सकारात्मक मिळत नाही.
भारतीय परंपरेच्या नुसार समानता, बंधुता, स्वतंत्रता यासारखी मूल्ये विद्यार्थ्यांत रूजवुन त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास करणे, त्यांना भविष्यातील जबाबदार नागरिक बनवणे, चारित्र्यसंपन्न बनवणे सोबत त्यांच्या ज्ञानाचा उत्तरोत्तर विकास करणे हा शिक्षणाचा मूळ उद्देश असला पाहिजे. हा उद्देश शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संबंधातून साध्य होतो. हजारो वर्षांपासून वर्गात चालणा-या अध्ययन-अध्यापनाचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानाचे डोस पाजणे हा राहिलेला नाही. वर्गातील शिक्षणात एकमेकांसोबत जगण्याची कला, एकमेकांची मदत करण्याची प्रवृत्ती हळू-हळू विकसित होत असते. सामुहिकतेचा भाव सुद्धा हळू-हळू येथूनच विकसित होत असतो. एक-दूस-यांच्या विचारांचा सन्मान करणेही आपण येथूनच शिकतो. वर्गातील शिक्षणात असणारी गुरू-शिष्य परंपरेत एक वेगळाच आनंद असतो. ऑनलाईन शिक्षण पद्धत मात्र हे उद्देश पूर्ण करण्यात अयशस्वी आहे. ही व्यवस्था आपल्या मूळ उद्देशांपासून खूप दूर घेवून जाणारी आहे. ही अशी व्यवस्था आहे ज्यात केवळ आपल्याला काही प्रमाणात पुस्तकी अथवा तांत्रिकी ज्ञान तर मिळेलच मात्र हे ज्ञान आत्मसात करून त्याचे नेमके करायचे काय? हे विद्यार्थ्याला समजणार नाही.
फक्त शिक्षणच नाही तर विद्यार्थी जीवनात केलेल्या अनेक कृती आपल्या भावी जीवनावर प्रभाव टाकत असतात. विद्यार्थी जीवनातील या कृतींमुळेच आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास होत असतो. वर्ग आणि वर्गाबाहेरील गट चर्चा, वाद-विवाद आपल्या व्यक्तीमत्व निर्मितीत महत्वाची भूमीका निभावतात. ऑनलाईन शिक्षण आपल्याला या सा‌-यांपासून वंचित ठेवते. व्यक्तीमत्व विकासातील ही कमी आपल्याला कोठे नेवून सोडील हे सांगता येत नाही. विद्येने विनय, विनयाने योग्यता, योग्यतेने धन, धनाने धर्म आणि धर्माचे पालन केल्याने सुखाची प्राप्ती होते असा आपला विद्येच्या बाबतीत विचार आहे. ईथे धर्माचा संबंध पुजा-पाठाशी कदापी नाही. धर्माचा अर्थ समाज कल्याण आहे. याचाच अर्थ आपल्या शिक्षणाचा अंतिम उद्देश हा समाजाचे कल्याण असला पाहिजे. या उद्देश पूर्तीत अगोदरच कमतरता आहे, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे तर या उद्देशाची पाळेमुळेच नष्ट होतील. जर व्यक्तीत सहअस्तीत्व, सामूहिकता आणि सहिष्णुता इत्यादी योग्य प्रकारे विकसित झाली नाही तर समाज भलेही भौतिक स्तरावर संपन्न होईल मात्र त्यात अनेक विसंगती राहतील ज्या सामाजिक समस्यांना जन्म देतील. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत या सर्व सामाजिक गुणांना विकसित करण्याची क्षमता नच्या बरोबर आहे.
वरिल सर्व तर वैचारिक गोष्टी झाल्या आता आपण ऑनलाईन शिक्षणाची व्याव्हारिकता तपासून पाहू या. भारतात मोठया प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे. असे किती विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी तांत्रिक साधने आहेत? यात अशे मोठया संख्येने आहेत ज्यांच्याकडे ही साधने असुनसुद्धा घरात एकांताचा अभाव आहे. टिव्हीचा गोंगाट, स्वयंपाक घरातील आवाज सर्वांचा त्यांना सामना करावा लागतो. अशी खूप कमी घरे आहेत ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी साधनेही आहेत आणि वातावरणही. हे ज्ञानाच्या मार्गात मोठा भेदभाव निर्माण करणार आहे. खरंतर अशाप्रकारचा भेदभाव अगोदरच उपलब्ध आहे मात्र याची व्याप्ती ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे आणखीनच वाढेल जो सामाजिक संतुलनासाठी खूप घातक आहे.
अगदी छोट्याश्या कालखंडात ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणामही समोर येत आहेत. मुलांचे ऑनलाईन वर्ग ४ ते ५ तास चालवण्यात येतात. याशिवाय मुलांना गृहपाठही दिला जातो. एकूण विद्यार्थी आणि शिक्षक दोघे मिळून ८ तास ऑनलाईन राहणार आहेत. हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्थितींसाठी घातक आहे. लहान मुलांसाठी तर खूपच घातक. मुलांमध्ये यामुळे डोळ्यावर परिणाम आणि चिडचिडेपणा निर्माण होतो. काही मुलांमध्ये मानसिक आजार निर्माण होत आहेत. या ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेमुळे मुलात एकलकोंडेपणा निर्माण होत आहे. एकूण पाहिल तर ऑनलाईन शिक्षण हा शालेय शिक्षणाला पर्याय बनताना दिसत नाही. मात्र सद्यस्थितीत याशिवाय दुसरा कोणता पर्यायही दिसत नाही.
-सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular